Skip to content

पक्षिमित्र संमेलन

पक्षिमित्र संमेलन – एक चळवळ

१९८२ साली महाराष्ट्रतील पक्षीमित्र मोठ्या संखेने नागपूर नगरीत एकत्र जमले. या मित्र मेळाव्याने विदर्भ भुमीत येऊन “पक्षीमित्र संमेलन” हे नाव धारण केले.

प्रतिवर्षी महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेचे संमेलन नोव्हेंबर ते फ़ेब्रूवारी या कालावधीत महाराष्ट्रात कोठेतरी भरत असते, याचे आयोजन स्थानिक संस्था करतात. संमेलनात पुढील संमेलनसाठी अर्ज येतात. त्याची छाननी करून एका संस्थेला सदर संमेलन भरवण्यासाठी निवडण्यात येते.

पक्षीनिरिक्षणाचा छंद प्रामुख्याने धनिका पर्यंतच मर्यादीत होता. दुर्बिणीसारखी साधने उपलब्ध होऊ लागल्याने गेल्या ३०-४० वर्षात या छंदाने महाराष्ट्रीय मध्यम वर्गात पवेश केला. कदाचीत व्यंकटेश माडगूळकर, मारूती चित्तंपल्ली आणी प्रकाश गोळे आदींच्या मराठी साहीत्यातील हा परिणाम असावा. कारण काहीही असो, या दरम्यान महाराष्ट्रीय मध्यम वर्गात हा छंद रूजायला लागला होता खरा. त्यावेळी एकाकी धडपडणारे पक्षीनीरीक्षक महाराष्ट्रभर विखूरले होते. त्यांना एकत्र येण्याची संधी सर्व प्रथम उपलब्ध करून दिली ती पुण्याचे श्री. प्रकाश गोळे यांनी. सन १९८१ साली त्यांनी लोणावण्यात पक्षीनीरीक्षकांना एक अनौपचारीक मेळावा घेतला.

पुणे, मुंबई, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशीक, औरंगाबाद, येथ पासून थेट नागपूर पर्यंतचे पक्षीमित्र मेळ्याव्यात एकत्र आले आणी बघता बघता घनिष्ट मित्र होऊन गेले.

पहिले पक्षिमित्र संमेलन

इंटरनॅशनल क्रेन फ़ाउंडेशन चे अध्यक्ष जॉज अर्चिबाल्ड यांच्या संक्रिय सहभागामूळे हे संमेलन विशेष स्मरणीय ठरेल. आरंभीच्या काळातील ही संमेलने अनौपचारीक कौंटुंबीक मीत्र मेळावेच असत. मित्रांचे वार्षीक स्नेह मिलन घडावे, पक्षी निरीक्षणातील परस्परांच्या अनुभवांची देवाण-घेवाण व्हावी, तज्ञांचे सहज मार्गदर्शन मिळावे व सामुहीक पक्षी निरीक्षणाच्या आनंद लुटावा अशा माफ़क अपेक्षांची ती संमेलने होती. हे स्वरूप लोभस होते.

पक्षिमित्र संमेलनाचा प्रभाव

लवकरच महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन लोकप्रीय झाले. संमेलनात पक्षी निरीक्षकांची तथा उत्सुक निसर्ग प्रेमींची गर्दी होऊ लागली. कवी कुसमाग्रजांच्या उपस्थीतीने दरवळलेले नाशिक संमेलन व डॉ. सलीम अलींच्या उपस्थीतीने गाजलेले औरंगाबाद संमेलन ही तर साहीत्य संमेलनाचा आभास घडवीणारी भव्य संमेलने होती. त्या काळात महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाचा प्रभाव महाराष्ट्र शासनाच्या धोरणातही जाणवू लागला. पक्षीमित्र संमेलनाच्या ठरावानूसार मायणी, जायकवाडी व नंदूरमधमेश्वर आदि जलाशयांना पर्यायाने तेथील पक्षांना शासकीय संरक्षण प्राप्त झाले.

पक्षांविषयी आस्था असणा-याना पक्षीमित्र बनवावे. पक्षीमित्रांना अभ्यासू पक्षीनिरीक्षक बनवावे. पक्षी निरीक्षकातून पक्षी अभ्यासक घडवावे व या अभ्यासकांतून हौशी पक्षीतज्ञांची एक फ़ळी उभी व्हावी हे खरं तर पक्षीमित्र संमेलनाच्या आजवरच्या अखंड आयोजनातून अभिप्रेत आहे.

कै. रमेश लाडखेडकर

सा-या भारतात पक्षीमित्र संमेलनाचा उपक्रम केवळ महाराष्ट्रात राबविला जातोय याचा रास्त अभिमान बाळगायला हवा. संमेलनाची अखंडता व स्वयंसेवी चारित्र्य देखील अभिमानास्पद आहेत. आजवरच्या संमेलन आयोजनाच्य़ा प्रदीर्घ प्रक्रियेतून एक अनुभवी सामूहिक संघटन महाराष्ट्र्भरातून उभारले आहे. ही महत्वाची उपलब्धी आहे. ‘महाराष्ट्र पक्षीमित्र’ ची निर्मिती करुन पक्षीमित्र चळवळीने आता संघटीत पर्वात प्रवेश केला आहे. महाराष्ट्रातील पक्षीमित्रांची नवी पिढी हा संपन्न वारसा अधिक समृध्द करेल असा विश्वास बाळगुया.

मातृभाषा – मराठीतून पक्षीविषयक लिखाण

संमेलनाच्या चळवळीचा प्रभाव सर्वदूर पसरलेल्या पक्षीमित्र आणि निसर्ग प्रेमींवर ही दिसू लागला. मराठीतून पक्षीविषयक लिखाण वृत्तपत्र व नियतकालीकातून मोठ्या प्रमाणावर प्रकाशीत होऊ लागले. अनेक नवनवीन पक्षीनीरीक्षकांनी यावेळी लेखनाच्या क्षेत्रात प्रवेश केला. मातृभाषा मराठीतून पक्षी तथा निसर्ग विषयक अभ्यासाला चालना मिळावी किंबहुना महाराष्ट्रातील निसर्ग संरक्षण चळ्वळीला मातृभाषा मराठीचे अधिष्ठान मीळावे हा महाराष्ट्र पक्षी मित्र चळवळीचा प्रधान हेतु होता. असा तो अंशत: सफ़लही झाला. गेल्या ३३ वर्षाची महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाची वाटचाल झाली.

महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेचे पक्षिमित्र संमेलन.

प्रतिवर्षी महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेचे संमेलन नोव्हेंबर ते फ़ेब्रूवारी या कालावधीत महाराष्ट्रात कोठेतरी भरत असते, याचे आयोजन स्थानिक संस्था करतात.