पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार श्री. गोविंद सबनीस यांना जाहीर

गेली चार दशके महाराष्ट्रात पक्षीविषयक कार्य करणारी संस्था “महाराष्ट्र पक्षिमित्र” तर्फे देण्यात येणाऱ्या २०२४ च्या पक्षिमित्र पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यावर्षीचा पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार पंढरपूर येथील श्री. गोविंद रघुनाथ सबनीस यांना जाहीर करण्यात आला.
- इतर पुरस्कारांपैकी पक्षी संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथील फिरोज गुलाब चाऊस यांना जाहीर करण्यात आला आहे.
- पक्षी जनजागृती पुरस्कार वर्धा येथील श्री. राहुल वकारे यांना जाहीर करण्यात आला आहे.
- यावर्षीचा पहिला पक्षी साहित्य पुरस्कार परभणी येथील श्री. माणिक प्रल्हाद पुरी यांना जाहीर करण्यात आला.

(जीवनगौरव पुरस्कार)

(जनजागृती पुरस्कार)

(पक्षी संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार)

(पक्षी साहित्य पुरस्कार)
पक्षी संशोधन पुरस्कार या गटात योग्य प्रस्ताव प्राप्त न झाल्याने यावर्षी जाहीर करण्यात आला नाही. यावर्षीपासून नव्याने सुरुवात झालेल्या पक्षी विषयक साहित्य पुरस्काराची घोषणा सुद्धा यावेळी करण्यात आली. पक्षी सबंधित विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे २०१९ पासून या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली असून यामध्ये दरवर्षी चार पुरस्कार देण्यात येत असतात. यावर्षीपासून यामध्ये साहित्य पुरस्काराची भर पडली आहे. या पुरस्कारांची घोषणा महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे अमरावती येथे संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी केली. या पुरस्कारांचे वितरण शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर येथे होणाऱ्या येत्या ३७ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनात करण्यात येणार आहे.
यावर्षीचा स्व. रमेश लाडखेडकर स्मृती पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार हा दीर्घकाळ पक्षिमित्र चळवळीत राहून, पक्षी संवर्धन व जनजागृती यासाठी कार्यरत पक्षिमित्र, चळवळीतील मार्गदर्शक, पंढरपूर येथील जेष्ठ सभासद श्री. गोविंद रघुनाथ सबनीस यांना जाहीर करण्यात आला आहे. रोख रक्कम, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून हा पुरस्कार विदर्भ पक्षिमित्र मंच द्वारे डॉ. अनिल पिंपळापुरे यांचे तर्फे प्रायोजित करण्यात आलेला आहे. दुसरा पुरस्कार पक्षिमित्र पक्षी संवर्धन व सुश्रुषा हा पुरस्कार पक्षिमित्र चळवळीतील पक्षी संवर्धन, तथा जखमी पक्षी प्राणी उपचार आदी क्षेत्रात कार्यरत कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथील प्रसिद्ध वन्यजीव प्रेमी व पक्षी संरक्षक श्री फिरोज गुलाब चाऊस यांना जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार नागपूर येथील महाराष्ट्र पक्षिमित्रचे सदस्य श्री. अनिल बहादुरे यांचे तर्फे प्रायोजित करण्यात आला आहे. तिसरा पुरस्कार स्व. रामभाऊ शिरोडे (वाणी) स्मृती पक्षिमित्र पक्षी जनजागृती पुरस्कार हा पक्षिमित्र चळवळीत राहून पक्षी अभ्यास आणि पक्षी विषयक जनजागृती आदी क्षेत्रात कार्यरत वर्धा येथील श्री. राहुल वकारे यांना जाहीर करण्यात आला आहे. रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून हा पुरस्कार श्री. अविनाश शिरोडे, नाशिक यांचे तर्फे प्रायोजित करण्यात आलेला आहे.
यावर्षीपासून पक्षी या विषयावर सातत्याने लेखन करणाऱ्या साहित्यिक, लेखकांसाठी नवीन पुरस्काराची सुरुवात करण्यात आली असून यावर्षीचा पहिला श्रीमती सुशीला पाटकर स्मृती पक्षी साहित्य पुरस्कार परभणी येथील पक्षी अभ्यासक तथा पक्षी व निसर्ग या विषयावर सातत्याने लेखन करणारे लेखक श्री. माणिक प्रल्हाद पुरी यांना जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार अॅड. चंदना साळगावकर, मुंबई यांचे तर्फे प्रायोजित करण्यात आलेला आहे.
या पुरस्काराचे वितरण ३७ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनात करण्यात येणार असून यावर्षी महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन शेवगाव जिल्हा अहिल्यानगर (अहमदनगर) येथे दि. ०१-०२, फेब्रुवारी २०२५ दरम्यान होणार आहे. या पुरस्कारांचे वितरण संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे संस्थेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी कळविली आहे.