महाराष्ट्र पक्षिमित्रचे पुरस्कार जाहीर

पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार श्री. दिगंबर गाडगीळ यांना जाहीर

 

अमरावती: गेली चार दशके महाराष्ट्रात पक्षीविषयक कार्य करणारी संस्था “महाराष्ट्र पक्षिमित्र” तर्फे देण्यात येणाऱ्या २०२३ च्या पक्षिमित्र पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यावर्षीचा पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार नाशिक  येथील श्री. दिगंबर गाडगीळ यांना जाहीर करण्यात आला. इतर पुरस्कारांपैकी पक्षी संशोधन पुरस्कार सालिम अली सेंटर फॉर ऑर्निथालॉजी कोइम्बतुर येथील पक्षी शास्त्रज्ञ डॉ. शिरीष मंची यांना, पक्षी संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार अमरावती येथील प्रसिद्ध वन्यजीव प्रेमी श्री. राघवेंद्र नांदे यांना तर  पक्षी जनजागृती पुरस्कार अकोला येथील श्री. अमोल सावंत यांना जाहीर करण्यात आला आहे. पक्षी सबंधित विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे २०१९ पासून या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली असून यामध्ये दरवर्षी चार पुरस्कार देण्यात येत असतात. या पुरस्कारांची घोषणा महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे अमरावती येथे संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी केली. या पुरस्कारांचे वितरण सांगली येथे होणाऱ्या येत्या ३६ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनात करण्यात येणार आहे.

यावर्षीचा स्व. रमेश लाडखेडकर स्मृती पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार हा दीर्घकाळ पक्षिमित्र चळवळीत राहून, पक्षी संवर्धन व जनजागृती यासाठी कार्यरत पक्षिमित्र, चळवळीतील मार्गदर्शक, जेष्ठ सभासद, तथा पक्षी विषयक पुस्तकांचे लेखक, पक्षिमित्र अंकाचे संपादक, नाशिक येथील श्री. दिगंबर गाडगीळ यांना जाहीर करण्यात आला आहे. रोख रक्कम, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून हा पुरस्कार विदर्भ पक्षिमित्र मंच द्वारे डॉ. अनिल पिंपळापुरे यांचे तर्फे प्रायोजित करण्यात आला आहे. दुसरा पुरस्कार स्व. डॉ. जी. एन. वानखेडे स्मृती पक्षी संशोधन पुरस्कार हा पक्षिमित्रचे सभासद व सालिम अली सेंटर फॉर ऑर्निथालॉजी कोइम्बतुर येथील पक्षी शास्त्रज्ञ डॉ. शिरीष मंची यांना जाहीर करण्यात आला. रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून हा पुरस्कार स्व. डॉ. जी. एन. वानखेडे मेमोरिअल फंड तर्फे प्रायोजित करण्यात आला आहे.  

यावर्षीचा पक्षिमित्र पक्षी संवर्धन व सुश्रुषा हा पुरस्कार पक्षिमित्र चळवळीतील पक्षी संवर्धन, तथा जखमी पक्षी प्राणी उपचार आदी क्षेत्रात कार्यरत अमरावती येथील प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक पक्षिमित्र श्री. राघवेंद्र नांदे यांना जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार नागपूर येथील महाराष्ट्र पक्षिमित्रचे सदस्य श्री. अनिल बहादुरे यांचे  तर्फे प्रायोजित करण्यात आला आहे. चौथा पुरस्कार स्व. रामभाऊ शिरोडे (वाणी) स्मृती पक्षिमित्र पक्षी जनजागृती पुरस्कार हा पक्षिमित्र चळवळीत राहून पक्षी अभ्यास आणि जनजागृती आणि शालेय विद्यार्थी पक्षिमित्र संमेलनांचे  माध्यमातून पक्षी विषयक जनजागृती आदी क्षेत्रात कार्यरत अकोला येथील सभासद श्री. अमोल सावंत यांना जाहीर करण्यात आला आहे. रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून हा पुरस्कार श्री. अविनाश शिरोडे, नाशिक यांचे तर्फे प्रायोजित करण्यात आलेला आहे.

या पुरस्काराचे वितरण ३६ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनात करण्यात येणार असून यावर्षी महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन सांगली येथे २३-२४ डिसेंबर २०२३ मध्ये होणार आहे. या पुरस्कारांचे वितरण संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे संस्थेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी कळविली आहे.